पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित
पुणे(BS24NEWS)
पुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.
दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्या वतीने १३ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. बघेल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे उपस्थित होते. यावेळी देशातील विविध भागांमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यांना, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारत निवडणूक आयोगाचा या वर्षाची संकल्पना ‘मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’, अशी आहे. यावेळी प्रख्यात निर्देशक सुभाष घई द्वारा निर्मित ‘मैं भारत हॅुं’ या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राशी संवाद साधताना ते म्हणाले, आजचा महत्वाचा दिवस आहे. तेरावा राष्ट्रीय मतदार दिवस आज आपण या ठिकाणी साजरा केला आणि सर्व देशामध्ये दहा लाख पेक्षा जास्त ठिकाणी आज आपण साजरा करत आहोत, मी आजच्या मतदार दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रामधील आणि विशेष करून पुणे जिल्ह्यामधील ८० लाख मतदारांना शुभेच्छा देतो, त्यांचा अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाचे आम्ही आभार मानतो. पुणे जिल्ह्यामधील आमच्या सर्व टीमने गेल्या दोन वर्षांमध्ये मतदार यादी आणि निवडणुकांच्या संदर्भात घेतलेल्या परिश्रमाची फलश्रुती आज मिळाली आणि आज आमच्या सगळ्या टीमला माझ्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. यामध्ये जवळपास सात लाखापेक्षा जास्त जे निवासी मतदार आहेत त्यावर काम केले. त्याचप्रमाणे मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष करून महिला मतदार, तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली, विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. १७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदारांची नोंदणी करण्यासाठी २५ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी ४४२ महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून ४८ हजारावर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
पुणे जिल्ह्यात युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे त्यांनी विशेष लक्ष देण्यात आले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्हाधिकारी यांनी तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा निवडणूक आयोगाने विशेष गौरव केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी विशेष पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार मोठे व लहान उद्योगांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करण्यात आली. उद्योगांच्या ठिकाणी समन्वयक अधिकारी नेमून तसेच उद्योगांमध्ये मतदार जागृती संघ स्थापन करून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांना यापूर्वीदेखील जिल्ह्यात पीएम किसान योजनेतील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियानातील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला होता.
यावेळी ‘इलेक्टिंग द फर्स्ट सिटिजन- एन इलेस्ट्रेटेड क्रॅानिकल ऑफ इंडियाज प्रेसिडेंशियल इलेक्शन’ पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना भेट स्वरूपात देण्यात आली. राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते एकूण १३ राष्ट्रीय पुरस्कार वितरित करण्यात आले.