डॉ. सुरवसे व डॉ.दिवेकर यांचे डिझाईन पेटंटला भारत सरकारची स्वीकृती व अनुदान मंजूर
दौंड(BS24NEWS)
दौंड तालुक्यातील एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालय वरवंड येथील भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ. राजेश भास्कर सुरवसे व सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय केडगाव येथील भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ. अशोक भगवान दिवेकर यांच्या “मच्छिमारांकरीता सागरी सीमा इशारा यंत्रणा” या डिझाईन पेटंट ला भारत सरकारकडून स्वीकृती, मान्यता व अनुदान मंजूर झाले आहे.
समुद्र किनारपट्टीवर राहणारे स्थानिक लोक समुद्रातून मासेमारी करून आपली उपजीविका भागवत असतात व आपला व आपल्या कुटुंबाचा चरित्रार्थ चालवत असतात. मात्र खोल समुद्राचा अंदाज न आल्याने तसेच तात्कालिक वादळांची स्थिती निर्माण झाल्याने अनेक मच्छीमारांच्या बोटी समुद्रामध्ये भरकटल्या जातात, काही अपघात होतात व असंख्य मच्छीमार दरवर्षी मृत्युमुखी पडतात. अशा मच्छीमारांचे कित्येक कुटुंब उध्वस्त होतात यावर काहीतरी उपाय निर्माण व्हावा या हेतूने प्राध्यापक डॉ. राजेश सुरवसे व प्राध्यापक डॉ. अशोक दिवेकर यांनी मच्छीमारांना या धोक्यातून वाचविण्याकरिता तसेच येणाऱ्या संकटांची आगाऊ सूचना मिळवणारी यंत्रणा निर्माण केली व सदर यंत्रणेचे डिझाईन तयार करून ते कंट्रोल बोर्ड ऑफ पेटन्स ट्रेडमार्क अँड डिझाईन भारत सरकार यांचेकडे सादर केले त्यावर विविध पातळीवर परीक्षण होऊन त्यांचे हे डिझाईन पेटंट भारत सरकारकडून स्वीकारले गेले व त्यांच्या या पेटंटला भारत सरकारचे अनुदान मंजूर झाले अशा प्रकारचे संशोधन हे येत्या कालावधीमध्ये भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक मच्छीमारांकरिता अतिशय उपयुक्त व वरदानच ठरणार आहे. डॉ. सुरवसे व डॉ. दिवेकर यांना नुकताच महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेकडून “उत्कृष्ट संशोधन कार्य” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.