पिसाळलेला कुत्रा घालतोय राहू गावात हैदोस नागरिकांना सावधानतेच इशारा
राहू (टीम बातमीपत्र) – राहू, ता. दौंड येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून, या कुत्र्याने मंगळवारी रात्री ७ च्या सुमारास महात्मा फुले चौक व युको बँक परिसरात जवळपास १० ते १५ जणांना जबरी चावा घेतला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये अनेक महिला, पुरुष व लहान मुलांचा समावेश आहे. दुकानातून सामान घेऊन येणाऱ्या, अंगणात खेळणाऱ्या, घरासमोर बसलेल्या, गावातून घरी निघालेल्या अशा अनेकांवर या कुत्र्याने प्राणघातक हल्ला केला आहे.
या हल्ल्यात काहीजण गंभीर जखमी झाले असून त्यांना ससून येथे उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याचे देखील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले असून, काहींवर राहू येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळे संपूर्ण राहू परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीत वावरत आहेत. उपयोजना करण्याची मागणी नागरिक सोशल मिडीयाच्या माध्यमातून करीत आहेत.