आमदारांची वचनपूर्ती, दौंडमध्ये वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू होणार, राज्यमंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी
दौंड(टिम – बातमीपत्र)
दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर ) स्थापन करण्यासाठी व आवश्यक असणाऱ्या पद निर्मितीसाठी आज दि. १९ रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. ते दौंड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, माजी नगरसेवक नंदु पवार हे यावेळी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना आमदार कुल म्हणाले की , अनेक दिवसांपासून दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो .मागील आमच्या सरकारच्या काळात याला मान्यता मिळाली होती . मात्र त्यानंतर हे काम रखडलेले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे या कामाबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला त्यामुळे आज याची मंजुरी मंत्रिमंडळात घेण्यात आली आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तालुक्याच्या वतीने जाहीर आभार .
आज झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) यासाठी 20 पदे मंजुर करण्यात आली आहेत.
दौंड विधानसभा निवडणुकीत दौंडकर नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण शकलो याचे समाधान वाटत आहे .या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांना इतर कुठेही न जाता दौंड न्यायालयातच त्यांची कामे पूर्ण होणार आहेत याचा एक वकील या नात्याने मला अभिमान आहे असेही आमदार कुल यांनी सांगितले.
दौंड तालुक्यातील वकिल संघटनेने या मंजुरीमुळे पेढे भरवत सत्कार केला आहे.