दौंडमध्ये ऐन उन्हाळ्यात बंधारे तुडूंब, आमदार कुल यांच्या पाणी नियोजनाचा प्रभाव दिसला.
दौंड (टीम – बातमीपत्र)
स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील ओढ्यावरील सर्वच बंधारे भरल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. खंडित झालेले उन्हाळी आवर्तनातील पाणी आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून पुन्हा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी ओढ्याद्वारे सोडल्याने गावावरील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे.
उन्हाळी आवर्तनातून खडकवासला धरण कालव्यामधून नुकतेच या परिसरात पाणी सोडण्यात आले होते. मात्र, तातडीच्या सिंचनाने हे पाणी स्वामी चिंचोली गावच्या तळापर्यंत पोहोचले नसल्याने ग्रामस्थांनी आमदार राहुल कुल यांच्याकडे मागणी केली. त्यामुळे आमदार राहुल कुल यांनी तातडीने पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले.
या आदेशानुसार मळद परिसरात शेतकर्यांच्या मदतीने 32 फाटा फोडून 15 किलोमीटर अंतरावर असणार्या चिंचोली गावाला ओढ्याद्वारे पाणी सोडले गेले. या पाण्याने ऊस पिकाबरोबर जनावरांच्या चारा पिके वाचली गेली. तसेच पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न सुटला आहे.
याबाबत बोलतान स्वामी चिंचोलीचे माजी सरपंच अझरुद्दीन शेख म्हणाले की, स्वामी चिंचोलीकरांना नेहमीच तळाशी असल्याने पाण्यासंदर्भात अडचणी निर्माण होतात. गेली अनेक वर्षे आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून चिंचोलीकरांना पुरेसे पाणी भेटते. यंदाही कुल यांनी लक्ष घालून बंधारे भरून दिल्याने गावातील प्रत्येक नागरिकाच्या मनात समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.