दौंड (टीम – बातमीपत्र)
पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखानदारांपैकी ११ साखर कारखान्यांनी साखर हंगाम संपून ३ महिने झाले तरी अद्यापही एफ आर पी पूर्ण केली नाही अशा साखर कारखान्यांनी त्वरित व्याजासहित एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी यासाठी रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे व दौंड तालुका रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सर्फराज शेख यांनी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना लेखी निवेदन दिले आहे.
या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वास्तविक पाहता एफआरपी एका टप्प्यात १५ दिवसाच्या आत देण्याचा कायदा आहे. परंतु साखर कारखानदार शेतकऱ्यांना भूलथापा देऊन दोन टप्प्यात एफ आर पी देण्यासाठी संमती पत्र लिहून घेतात. याचाच गैरफायदा साखर कारखानदार घेतात. परंतु सदर दोन टप्प्यातील एफआरपीचे संमती पत्र हे बेकायदेशीर असून संमती पत्र जरी शेतकऱ्यांनी दिल तरीसुद्धा एफआरपी एका टप्प्यात देणे आवश्यक असते.
जर ३० जुन २०२३ पर्यंत शेतकऱ्यांना थकीत एफआरपी व्याजासहित न मिळाल्यास १ जुलै २०२३ पासून रयत क्रांती पक्ष,संघटना संबंधित साखर कारखान्यावरती आंदोलन करणार आहे असेही निवेदनात म्हटले आहे.