कृषीपुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी

म्हणतात ना हौसेला मोल नसते दौंड मध्ये चक्क गाईचं अनोखं डोहाळ जेवण

मलठण (टीम – बातमीपत्र)

शेती व्यवसायात आणि हिंदू धर्मात गाईला मोलाचे असे स्थान लाभले आहे. सनातन हिंदू धर्मात गाईला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे आपल्या हातून गोसेवा व्हावी या अनुषंगाने शेतकरी बांधव आपल्या दावणीला गाय कायमच ठेवतात.
शेतकरी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे गाईची तसेच दावणीला असलेल्या इतर जनावरांची काळजी घेत असतात. शेतकरी आणि त्याच्या दावणीला असलेल्या जनावरांचे प्रेम नेहमीच पाहायला मिळते. दरम्यान आता पुणे जिल्ह्यातही असंच एक उदाहरण पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मलठण येथील एका शेतकऱ्याने आपल्या गाईचा चक्क डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला आहे. यामुळे सध्या या शेतकरी कुटुंबाची संपूर्ण परिसरात चर्चा रंगली आहे. खरं पाहता, गाईच्या दुधापासून अन शेणापासून शेतकऱ्यांनां चांगले उत्पन्न मिळत असते. गाय पालनातून शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न मिळतं, शिवाय गौपूजनला हिंदू धर्मात मोठं महत्व प्राप्त आहे.
हेच कारण आहे की, अलीकडे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात गाईचे संगोपन करू लागले आहेत. मलठण येथील भरतसिंह परदेशी हे देखील गाईचे संवर्धन करतात. गाईचे संवर्धन फक्त फायद्यासाठी परदेशी करत नसून आपल्या हातून गोसेवा व्हावी हा त्यामागचा हेतू आहे. दरम्यान आता गायीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी परदेशी यांनी त्यांच्या गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला आहे.
या परदेशी कुटुंबाने गायीचे डोहाळे जेवण घालून इतरांपुढे गायीच्या महतीचं पठनचं केलं आहे. खरं पाहता, शेतकऱ्यांसाठी आपल्या दावणीला बांधलेले जनावर कुटुंबातील सदस्याप्रमाणेच असतात. यामुळे परदेशी कुटुंबांनी डोहाळे जेवण सोहळा प्रसंगी गोमातेचे पूजन, कीर्तन, महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन देखील केले होते.
या कार्यक्रमाला गावातील अनेक शेतकरी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. निश्चितच एखाद्या शाही सोहळ्या प्रमाणे गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम परदेशी यांनी करून इतर शेतकऱ्यांच्या पुढे एक आदर्श रोवला आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!