जमीन खरेदी विक्री मध्ये त्रयस्थ व्यक्तीस आक्षेप घेण्याचा अधिकार नसावा,आमदार राहुल कुल यांनी मांडले विधानसभेत विधेयक……
दौंड (टीम – बातमीपत्र)
राज्यात जमीन खरेदी-विक्री होताना ब्लॅकमेलिंगचे प्रकार टाळण्यासाठी त्रयस्थ व्यक्तींना आक्षेप घेण्याचा अथवा तक्रार करण्याचा अधिकार नसावा याबाबतचे विधेयक क्रमांक २५ – महाराष्ट्र जमीन महसूल
संहिता (सुधारणा) विधानसभेत मांडले असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
याबाबत माहिती देताना आमदार कुल म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी असे निदर्शनास आले आहे की, जमीन व्यवहार करीत असताना जेंव्हा एखादा तलाठी किंवा तत्सम अधिकारी, फेरफार नोंदवहीत एखादी नोंद करतो आणि त्यावेळी अनेक ठिकाणी काही त्रयस्थ व्यक्ती, संस्था, माहिती अधिकार कार्यकर्ते व अन्य व्यक्तीच्या वैयक्तिक वादामुळे किंवा हेतुपुरस्सर त्यासंबंधित कागदपत्रे मिळवून सदर खरेदीखत, फेरफार नोंद यावर तक्रार अर्ज दाखल करून त्यामाध्यमातून सदर जमीन मालकास ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामधून आर्थिक फायदा झाल्यास नंतर पुन्हा अर्ज देऊन हरकत मागे घेतली जाते.यावर प्रतिबंध घालण्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ याच्या कलम १५० मधील पोट-कलम (२) मध्ये विहित करण्यात आलेली तरतूद अपूर्ण असल्याने, जमीन व्यवहार करीत असताना होत असलेले गैरप्रकार टाळण्यासाठी सदर प्रकरणाशी ज्यांचा थेट संबंध नसतो अशा व्यक्ती व संस्था यांना यामध्ये आक्षेप घेण्याचा अथवा तक्रार करण्याचा कोणताही अधिकार देण्यात येऊ नये. तसेच सदर फेरफार व नोंदवहीतील माहिती कळविण्यात येऊ नये, अशा प्रकारची सुधारणा संबंधित कलमामध्ये करणे आवश्यक असल्याची मागणी या सुधारणा विधेयकात केली आहे.
हे विधेयक विधानसभेत मांडले असुन ते मंजूर झाले असुन यावर आत्ता चर्चा होणार असुन लवकरच कायद्यात सुधारणा होणार असल्याचेही आमदार कुल यांनी सांगितले.
हे विधेयक मंजुर झाल्यास मोठ्या प्रमाणावर ब्लॅकमेलिंग थांबणार आहे.