शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविणार – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, (टीम बातमीपत्र) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.
या कार्यक्रमामार्फत तयार झालेल्या अभ्यासक्रमातून बांबूपासून शिल्प व वस्तू बनवण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना मिळेल तसेच अर्थार्जनासाठी या कौशल्याचा वापर कसा करावा याबाबतसुद्धा मार्गदर्शन मिळेल. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि स्वयं रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन कार्यरत आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे सर्वांचेच प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या साहित्याचा वसा घेऊन आपण सर्वच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत आहोत. त्यांच्या जयंतीनिमित्त सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. तरुणांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन आपल्या राज्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह आणि राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी उपस्थित होते.