वाहने चोरणारा रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार जेरबंद , यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची बार्शी येथे कारवाई
यवत (टीम – बातमीपत्र)
वाहने चोरणारा रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार जेरबंद करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,
दि. १८ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते दि. १९ऑगस्ट सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बोरीपार्धी (ता. दौंड जि. पुणे) गावचे हद्दीतील केडगाव चौफुला ते सुपा रोड वरील श्रीकृष्ण मंगल कार्यालया शेजारी नॅशनल गॅरेज येथे निलेश पांडुरंग लडकत ( रा. लडकतवाडी ता. दौंड जि.पुणे) यांची लॉक करून पार्क केलेली एक काळ्या रंगाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ (एम एच ४२ जी ४३४४) हि चारचाकी गाडी अंदाजे किंमत तीन लाख रुपये ही कोणी तरी संमती शिवाय चोरी करून नेली असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेण्यास सुरुवात केली केडगाव चौफुला ते सुपा रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता यवत गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली की हा गुन्हा रेकॉर्डवरील वाहन चोर महादेव उर्फ आप्पा सलगर (रा.उंडेगाव ता.बार्शी जि. सोलापूर) याने केला आहे. त्यानंतर यवत गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन उंडेगाव येथून संशयित आरोपी महादेव उर्फ आप्पा नागेश सलगर (वय २१ रा.उंडेगाव पाण्याच्या टाकीजवळ ता .बार्शी जि. सोलापूर ) ,अस्लम जलेब खान (वय ४० रा.खुशालपारख ता.जि. गाजियाबाद उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले असून त्यांचे ताब्यातून चोरून नेलेली महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी हस्तगत केली आहे.
यातील आरोपी महादेव उर्फ आप्पा सलगर रा. उंडेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याचेवर पाच गुन्हे दाखल आहेत असेही पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.
ही कामगिरी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश कदम ,पोलीस हवालदार गुरूनाथ गायकवाड, पोलीस हवालदार अक्षय यादव,पोलीस हवालदार महेंद्र चांदणे,पोलीस हवालदार रामदास जगताप, पोलीस हवालदार राजू मोमीन,पोलीस नाईक विशाल जाधव,पोलीस शिपाई मारुती बाराते,
पोलीस शिपाई भारत भोसले, पोलीस शिपाई सुनील कोळी यांचे पथकाने केली आहे.