दौंडमध्ये शिक्षक दिनी शिक्षकांकडून काळ्याफिती लावून शासनाचा निषेध…….
दौंड (टीम – बातमीपत्र)
प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यापेक्षा शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा बोजा जास्त वाढत चाललेला आहे.त्यामुळे दौंड तालुक्यातील शिक्षकांनी शिक्षक दिनी काळ्याफिती लावून शासनाचा निषेध करत कामकाज केले. याबाबत बोलताना शिक्षक नेते विकास शेलार म्हणाले की,वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण, वेग वेगळ्या माहिती, वेगळ्या परीक्षा यामुळे शिक्षक पूर्ण त्रस्त झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळच राहिलेला नाही. ज्या कारणासाठी शिक्षकाची नेमणूक झाली त्या कारणासाठी म्हणजे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांकडे वेळच नाही. अध्यापनापेक्षा इतर कामांमध्ये शिक्षकांना जास्त वेळ द्यावा लागतो. याचा संपूर्ण परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होताना दिसून येतो. गुणवत्ता ढासळली की पुन्हा शिक्षकांना जबाबदार धरले जाते. त्यामुळे या गंभीर बाबीचा शासनाने विचार करून अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राज्यातील सुमारे तीन लाख शिक्षक सहभागी झाल्याचेही विकास शेलार यांनी सांगितले .