धक्कादायक : हायवेच्या कामासाठी चक्क वापरला जात आहे चिखल……
इंदापूर शहरा नजिक होत असलेल्या हायवेच्या कामात धक्कादायक प्रकार...
इंदापूर(टीम- बातमीपत्र)
इंदापूर शहरा नजीक देशपांडे व्हेजच्या पाठीमागे नव्याने होत असलेल्या पुणे- सोलापूर महामार्गावरील सर्विस रोडचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या रोडचे काम एन. पी. इन्फ्रा या कंपनीकडून केले जात असल्याचे बोलले जात आहे. या कामाला कोट्यावधी रुपये खर्च होणार असून नॅशनल हायवेचे काम असल्यामुळे ते अत्यंत दर्जेदार होण्यासाठी करोडो रुपये सरकारचे खर्चले जाणार आहेत असे असताना मात्र या कामात मुरूम म्हणून चक्क चिखल वापरला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे व त्यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांनी ही बाब उघडकीस आणली आहे.दि.६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास या नॅशनल हायवेच्या कामासाठी हायवा डंपरने चक्क चिखल टाकण्यात येत असल्याचे पोपट शिंदे व शेतकरी यांच्या निदर्शनास आले. या कामासाठी मुरूम टाकण्याचे ऐवजी चिखल युक्त गाळ माती वापरली जात आहे. याचे प्रत्यक्षिकच पोपट शिंदे यांनी कंपनीचे सुपरवायझर व उपस्थित पत्रकारांसमोर करून दाखवले.
पोपट शिंदे यांनी चक्क या चिखलात स्वतः जाऊन हा चिखल आपल्या पायदळी तुडवून दाखवला. ज्या पद्धतीने कुंभार बांधव मडकी बनवण्यासाठी चिखल आपल्या पायाने तुडवतात तसाच काहीसा प्रकार उपस्थितांना दिसून आला. यावरून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पोपट शिंदे यांनी उदाहरणासह दाखवून दिले.
त्यानंतर शिंदे यांनी तात्काळ तहसीलदार श्रीकांत पाटील तसेच हायवेचे प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या रोडवर होत असलेल्या निकृष्ट कामाची भ्रमणध्वनीद्वारे माहिती देत त्यांना त्या चिखलाचे व्हिडिओ ही पाठवून दिले. त्यासंदर्भात येथील शेतकरी आक्रमक झाले असून येत्या दोन दिवसात या निकृष्ट कामाच्या विरोधात नॅशनल हायवे प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन संबंधित अधिकारी यांना निवेदन देणार असून याच रस्त्यालगत उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.