दौंडच्या उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या विरोधात निषेध मोर्चा …….
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव हे शहरातील ज्येष्ठ नागरिकांशी, विविध पक्षांच्या, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी अतिशय अव्यवहार्य पद्धतीने वागतात, त्यांच्याकडून सामान्यांना मिळणारी वागणूक उद्धटपणाची असते या त्यांच्या कृत्यांविरोधात आज (दि.८) रोजी निषेध मोर्चा काढण्यात येवुन त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे.
माजी नगराध्यक्ष शितल कटारिया, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी( कवाडे गट), ऑल इंडिया पॅंथर सेना, भीम वॉरियर्स संघटना, दौंड मर्चंट व व्यापारी महासंघ, नागरिक हित संरक्षण मंडळ आदींचे पदाधिकारी माजी नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आंदोलकांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निषेधाचे व मागणीचे निवेदन देण्यात आले.
या दिलेल्या निवेदनामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी (दि.५)डिसेंबर रोजी रात्री १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान शहरातील गोल राऊंड परिसरामध्ये ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्याशी अव्यवहार्य वर्तन केले असल्याने त्याचा निषेध करण्यात येत आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी कायदा सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे हे त्यांचे कर्तव्यच आहे यामध्ये दुमत नाही. परंतु हे सर्व करीत असताना त्यांनी आपल्या पदाचा अहंकार व अविर्भाव ठेवून सामान्य नागरिकांशी गैरवर्तन करणे निषेधार्थ आहे. यापूर्वी देखील त्यांच्याकडून नागरिकांशी उद्धट व गैरवर्तनाचे प्रकार झाले असून, त्यांच्याविरुद्ध अनेक व्यक्ती, पक्ष ,संघटना यांनी आंदोलने करून त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदविलेला आहे. परंतु पदाचा अहंकार असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव यांनी दौंड नगरीचे सहा वेळा नगराध्यक्ष पद भूषविलेले, समाजकारण व राजकारण यांच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू नागरिकांना नेहमीच मदतीची भावना ठेवणारे, शहरातील सामान्य नागरिकांच्या मनात आदराची भावना असलेले प्रेमसुख कटारिया यांच्याशी गैरवर्तन केले आहे याचा सर्व दौंडकर नागरिक जाहीर निषेध करीत आहोत. असे म्हटले असुन या घडलेल्या घटनेबद्दल त्यांचे निलंबन करण्यात यावे असे म्हटले असुन त्यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.