पुणे जिल्हा ग्रामीण

पालखी महामार्गावर दुचाकींच्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू , रायडर सह एक विद्यार्थी गंभीर जखमी……

वासुंदे (टीम – बातमीपत्र)

भरधाव दुचाकींच्या अपघातात शाळकरी मुलगा ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील नव्याने निर्माण झालेला बहुचर्चित जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील हिंगणीगाडा हद्दीत आज शनिवार (दि ६) रोजी सकाळी ७.१५ वाजताचे दरम्यान अपघात झाला आहे. या अपघातामध्ये हिंगणीगाडा ( ता. दौंड)
येथील गोरक्ष भीमराव भंडलकर व ऋषिकेश रमेश भंडलकर हे दुचाकीवरून वासुंदे येथील श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयात सकाळच्या शाळेसाठी जात होते. त्यांच्या दुचाकीला हिंगणीगाडा व वासुंदे गावच्या शिवेजवळ (ता. दौंड) येथील अनधिकृत महामार्ग दुभाजकाजवळ पाटसकडून बारामती कडे जाणाऱ्या भरधाव (शर्यतीसाठी वापरल्या जाणाऱ्या) दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघाताची भीषणता एवढी होती की अपघात घडल्या जागेवरून सदरची दुचाकी (स्पोर्ट बाईक) ही पाचशे फूट अंतरावर जाऊन दूरवर पडली होती.
या भीषण अपघातात वासुंदे येथील श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारा गोरक्ष भंडलकर हा विद्यार्थी जागीच ठार झाला, तर ऋषिकेश भंडलकर हा गंभीर जखमी झाला आहे. तर दुसऱ्या गाडीवरील रायडर हा ही जखमी झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला ज्या दुचाकीने धडक दिली तो दुचाकीस्वार हा रायडर असून त्याच्या दुचाकीचा वेग प्रचंड असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या अपघातात सदर विद्यार्थी चालवत असलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.
दरम्यान , या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी संतप्त होऊन अपघात स्थळी पालखी महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पाटस पोलीस चौकीचे सहायक निरीक्षक सलीम शेख यांनी सहकार्यांसमवेत घटनास्थळी तातडीने धाव घेत ग्रामस्थांशी संवाद साधला व परिस्थिती पूर्व पदावर आणली. यावेळी ग्रामस्थांकडून पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
ज्या अनाधिकृत दुभाजकाजवळ हा भीषण अपघात झाला तो दुभाजक हा अतिशय चुकीचा असून त्या ठिकाणी वाहन चालकांना निदर्शनास येईल अशा कोणत्याही प्रकारची महामार्ग सुरक्षितते बाबतची काळजी घेतलेली दिसत नाही. मार्गदर्शक सूचना अगर स्पीड ब्रेकर नसल्याने या नियमबाह्य दुभाजकामुळेच हा गंभीर अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला, असून हा दुभाजक बंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!