दौंडकरांच्या पसंतीला उतरलेल्या कटारिया ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा टॉस उडाला….. , 21 जानेवारीला रंगणार अंतिम सामना
दौंड(टीम – बातमीपत्र)
भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांची प्रचंड इच्छाशक्ती, क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारे क्रिकेटप्रेमी व्यावसायिक राजेंद्र उगले यांची मोठी मदत, निवृत्त क्रीडा शिक्षक माधव बागल यांची प्रचंड मेहनत तसेच दौंड सेंट्रल रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे दोन वर्षाच्या ब्रेकनंतर स्वा. सैनिक बाबुशेठ बोरीकर यांच्या स्मरणार्थ आयोजित कटारिया ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा टॉस अखेर उडाला. दौंडकर क्रिकेट प्रेमींच्या पसंतीला उतरलेल्या, भीमथडी शिक्षण संस्था व दौंड सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कटारिया ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला (दि.14 जानेवारी) रोजी सुरुवात झाली. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, डॉ. लक्ष्मण बिडवे ,गोविंद अग्रवाल ,नंदू पवार, राजेंद्र उगले तसेच रेल्वे विभागाचे सजी जेकब ,सुमंत कुमार ,शिंदे, संदीप शेलार व संजय सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडला.
मागील 23 वर्षापासून सुरू असलेली कटारिया ट्रॉफी, T20 लिग कम नॉक आउट पद्धतीने खेळविली जाते. यावर्षी या स्पर्धेकरिता मुंबई ,पुणे ,नगर ,नेरूळ ,कलबुर्गी येथील संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.दि.21 जानेवारी रोजी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार असल्याची माहिती माधव बागल यांनी दिली. कटारिया ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रणजी ट्रॉफी क्रिकेट स्तरावरील क्रिकेटपटूंच्या सहभागामुळे सामने चांगलेच रंगतात व त्यांचा खेळ पाहण्याची संधी दौंडकरांना मिळत असते त्यामुळे दौंडकरांची ही आवडती स्पर्धा आहे.आणि म्हणूनच येथील क्रिकेट प्रेमी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद देत असतात. यावर्षी कटारिया ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणता संघ बाजी मारणार व विजेता करंडक उंचावणार याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना आहे. कटारिया स्पर्धेच्या निमित्ताने, प्रेमसुख कटारिया, राजेंद्र उगले व माधव बागल व सहकाऱ्यां मुळे येथील कामगार मैदानाचा चेहरा मोहराच बदलला आहे. या स्पर्धेनंतर स्थानिक क्रिकेटपटूंना सरावासाठी व इतर स्पर्धांसाठी या मैदानाचा खुप फायदा होणार आहे, याचे आम्हाला खूप समाधान आहे अशा प्रतिक्रिया येथील खेळाडूंनी दिल्या.