दौंड पोलिस स्टेशन , डीवायएसपी कार्यालय आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी ५६ कोटीचा निधी मंजुर — आमदार राहुल कुल
दौंड (टीम- बातमीपत्र)
दौंड पोलिस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) कार्यालय, पोलीस कर्मचारी १०५ निवासस्थानांच्या इमारतीसाठी सुमारे ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.
दौंड व यवत पोलिस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) कार्यालय, पोलीस कर्मचारी निवासस्थानांच्या इमारती जीर्ण झाल्या असून, त्याजागी सुस्सज, नवीन इमारती उभारण्यात याव्यात अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती.
त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२३ मध्ये देखील लक्षवेधी सूचना देखील उपस्थित करून निधी मिळणेबाबत मागणी केली होती त्यावेळी उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशन कार्यालय तसेच पोलीस कर्मचारी वसाहतींसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार दौंड पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस अंमलदार तसेच पोलीस अधिका-यांकरिता १०५ निवासस्थाने करिता – ४६ कोटी ६६ लाख ८५ हजार रुपये, दौंड पोलीस स्टेशनची प्रशासकीय इमारत – ५ कोटी ९६ लक्ष ८८ हजार रुपये तर उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड यांची प्रशासकीय इमारत साठी २ कोटी ८९ लक्ष ५२ हजार रुपये अशा प्रकारे सुमारे ५६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
सदर सुसज्ज इमारतीमुळे दौंड शहराच्या वैभवात भर पडणार असून, लवकरच निविदा प्रक्रिया करून प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आहे. तसेच दौंड तालुक्याच्या विकासासाठी भरगोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.