विनापरवाना अफुची शेती करणारे मावडी क.प.चे दोघेजण ताब्यात , पुणे ग्रामीण पोलीसांची कारवाई
३५.२८ किलोग्रॅम वजनाचा व ७६ हजार ५६० रूपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत....
सासवड (टीम – बातमीपत्र)
विनापरवाना अफुची शेती करणारे दोघेजण मावडी क.प. ( ता. पुरंदर , जि. पुणे) येथुन ताब्यात घेत ३५.२८ किलोग्रॅम वजनाचा व ७६,५६०/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीसांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी जेजुरी पोलीस स्थानकाच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मौजे मावडी क.प.,( ता. पुरंदर , जि.पुणे) या गावातील किरण कुंडलीक जगताप व रोहीदास चांगदेव जगताप यांनी त्यांचे शेतात विनापरवाना बेकायदेशीरपणे अफुची लागवड करून उत्पादन घेतले आहे अशी बातमी मिळाली होती.या बातमीच्या अनुषंगाने जेजुरी पोलीस स्टेशन व भोर पोलीस स्टेशनकडील अधिकारी व स्टाफ यांनी मावडी क.प. गावातील जगताप मळ्यातील कवठीचा मळा येथे गेले. कवठीचा मळा येथील दोन वेगवेगळ्या शेतात जावून पाहणी करून कारवाई केली असता, शेतामध्ये किरण कुंडलीक जगताप, (वय ४० वर्षे) व रोहीदास चांगदेव जगताप (वय ५५ वर्षे,)( दोघे रा. कोडीत बु ॥ ता. पुरंदर, जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांनी शेतांमध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले. तसेच अफुची लागवड केलेली दिसून येवू नये याकरीता शेतात कांदा व लसून पिकाची लागवड केलेली होती.
या ठिकाणी ३८.२८ किलो ग्रॅम
वजनाची अफुची झाडे बोंडांसह अंदाजे किंमत रूपये ७६ हजार ५६० रूपयेची जप्त करणेत आलेली आहेत. या दोघांविरोधात जेजूरी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ब, १८ क, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हि कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत पांडुळे, भोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आण्णासाहेब पवार, जेजूरी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. दिपक वाकचौरे, पोसई महेश पाटील, पोसई नामदेव तारडे, पोलीस अंमलदार विठ्ठल कदम, शुभम भोसले, तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, भानुदास सरक यांनी केली आहे.