जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार , शिक्षकाची मनमानी चव्हाट्यावर , काय कारवाई होणार?
दौंड (टीम – बातमीपत्र)
मलठण (ता. दौंड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नेमणुकीस असलेला शिक्षक न आल्याने विद्यार्थी शाळेच्या बाहेर बसून राहिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मलठण (ता. दौंड) येथील गावठाण हद्दीत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेसाठी नेमणुकेस असलेले शिक्षक हे आज दि.५ मार्च रोजी अचानकपणे आले नाहीत. त्यामुळे शाळेमध्ये आलेले विद्यार्थी मात्र शाळेच्या बाहेरच बसले आहेत. या शाळेवर पूर्ण वेळ शिक्षक नसल्यानेच अशी परिस्थिती निर्माण झालेली पाहावयास मिळत आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेचा व पंचायत समितीचा शिक्षण विभाग करतोय तरी काय? असा सवाल निर्माण होत असून आंधळ दळतंय अन् कुत्र पीठ खातय ! या म्हणीप्रमाणे या शिक्षण विभागाचा कारभार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत स्थानिक नागरिक अमरसिंग परदेशी यांना विचारले असता ते म्हणाले की , शिक्षक शाळेवर आला नाही म्हणून मी स्वतः खात्री करण्यासाठी शाळेत गेलो असता शाळेमध्ये विद्यार्थी बाहेर बसले होते व वर्ग खोल्यांना कुलूप लावलेले होते. यामुळे मी संबंधित शाळेचे शिक्षक यांना भ्रमणध्वनिद्वारे फोन केला असता त्या शिक्षकांनी मी शाळेला आज सुट्टी दिली आहे असे सांगितले. वास्तविक कोणत्याही शाळेची स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार शाळेला आहे का ? आणि असल्यास याची पूर्वपरवानगी घेण्याची गरज असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता अशा मनमानी पद्धतीने शिक्षक वागत आहेत . अशा शिक्षकांमुळे उद्याचं घडणार भविष्य हे उज्वल कसे घडेल ? असा प्रश्न निर्माण झाला असल्याने आमच्या संपूर्ण गावच्या वतीने या शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई करावी अन्यथा आम्ही आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.