राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
आदर्श आचारसंहिता लागू
मुंबई (टीम – बातमीपत्र)
लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालय विधीमंडळ वार्ताहार संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना चोक्कलिंगम म्हणाले की, 18 व्या लोकसभेकरिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दि. 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधित एकूण सात टप्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान
भारत निवडणूक आयोगाने दि.16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील 05 लोकसभा मतदारसंघामध्ये दि. 19 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दि. 20 मार्च 2024 पासून सुरु होईल.
दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील 08 लोकसभा मतदारसंघामध्ये दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दि. 28 मार्च,2024 पासून सुरु होईल. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दि. 07 मे 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दि. 12 एप्रिल 2024 पासून सुरु होईल.
चौथ्या टप्प्यात खान्देश, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दि. 13 मे,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दि.18 एप्रिल,2024 पासून सुरु होईल. पाचव्या टप्प्यात खान्देश व कोकणातील 13 लोकसभा मतदारसंघामध्ये दि. 20 मे, 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यामध्ये मुंबई व ठाण्यातील मतदारसंघांचा सुध्दा समावेश आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दि. 26 एप्रिल, 2024 पासून सुरु होईल.
मतमोजणी दि. 04 जून, 2024 रोजी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.