बारामती लोकसभेसाठी आमदार राहुल कुलांवर मोठी जबाबदारी?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आमदार राहुल कुल व कांचन कुल यांची बैठक.....
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंडचे आमदार राहुल कुल व पत्नी कांचन कुल यांनी दि.28 रोजी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
या भेटीमध्ये देवेंद्र फडणीस यांनी पुणे जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत बारामतीतील राजकीय समीकरणाबाबत परिस्थिती जाणून घेतली असल्याची चर्चा आहे. या भेटीच्या अनुषंगाने आमदार राहुल कुल यांच्यावर बारामती लोकसभेची भाजपाकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
आमदार कुल यांनी लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीमध्ये पत्नी कांचन कुल यांना अतिशय कमी काळात निवडणूक रिंगणात उतरत सामाजिक सलोखा व सुसंस्कृतपणा जपत ही निवडणूक चुरशीची बनवली होती. यामध्ये कांचन कुल यांचा पराभव झाला असला तरी कुल कुटुंबांच्या लढवय्या वृत्तीची समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. नुकतेच कांचन कुल यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील 2019 च्या प्रतिस्पर्धी खासदार सुप्रिया सुळे यांनीही कुल कुटुंबांनी मागील निवडणुकीत सामाजिक सलोखा व सुसंस्कृतपणा जपल्याचे जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. मागील बारामती लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार राहुल कुल यांच्यावर भाजपाकडून नवीन मोठी जबाबदारी सोपवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाची आमदार कुल यांच्यावर भाजपा कडून मोठी जबाबदारी असणार आहे. आमदार कुल यांची लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या भूमिकेमुळे संपुर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे.