पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी

साथीदाराच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ; बारामती न्यायालयाचा निकाल….

दौंड ( टीम – बातमीपत्र)
दौंड येथे रेल्वेत चहा विक्री करणाऱ्या साथीदाराचा वादातून खून केल्याप्रकरणी पांडुरंग उर्फ वेडा कल्याण काकडे (रा. दौंड, ता. दौंड, जि. पुणे) यांस बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांनी आरोपीस खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदरचा गुन्हा दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हुतात्मा चौकामध्ये घडला होता. दिनांक ४/६/२०१७ रोजी पहाटे ५ च्या सुमारास हबीब पान शॉप जवळ गोपालसिंग गुद्दरसिंग परीहार (मूळ जलाला ता. घाटमपूर जिल्हा कानपूर उत्तर प्रदेश) याच्या पाठीत चाकूने वार करुन खून केला, अशी फिर्याद त्याचा मेहुणा सुमितसिंग जगदिशसिंग बदोरीया (रा. मूळ भराईपुरा ता. साखरी, जिल्हा भिंड मध्यप्रदेश) याने दौंड पोलिस स्टेशनमध्ये दिली होती.
सदर प्रकरणाचा तपास दौंड पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल सोनवणे यांनी केला होता व आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले. गुन्हा घडल्यापासून आरोपी न्यायालयीन बंदी होता.
आरोपी पांडुरंग काकडे तसेच मयत गोपाळसिंग परीहार हे रेल्वेमध्ये चहा व पाणी विकण्याचे काम करीत असत. त्यावरुन त्यांचे वादविवाद होते व त्यावरुनच आरापीने गोपाळसिंग परीहार यांचा खून केला केला होता. सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी ८ साक्षीदार तपासले. त्यातील काही साक्षीदार परराज्यातील असल्याने साक्षीदार न्यायालयात साक्षीसाठी आणण्यासाठी सरकार पक्ष व पोलीस यंत्रणा यांना खूप परीश्रम घ्यावे लागले. तसेच सदर खटल्यामध्ये दौंड उपजिल्हा रुग्णालयातील तात्कालीन वैदयकीय अधिकारी डॉ. बी. के. बागल यांचा न्याय वैदयकीय पुरावा महत्वाचा ठरला. तसेच इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
वकील प्रसन्न जोशी यांनी सदर खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपी पांडुरंग उर्फ वेडा कल्याण काकडे (दौंड, ता. दौंड) यास जन्मठेप व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली. सदर खटल्यामध्ये सरकारी वकील जोशी यांना कोर्ट पैरवी ओ.एस.आय नलवडे, दौंड ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टपैरवी अंमलदार ए.एस.आय. आर. डी. जगताप यांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!