कमी किंवा अतिघाम येण्याची कारणे काय?
: माणसाला येणारा कमी किंवा अतिघाम हे अनारोग्याचे लक्षण आहे. घाम यायलाच हवा पण तो नैसर्गिक आणि प्रमाणात. मुळात घाम का येतो, त्याचे कार्य काय हेही समजून घ्यायला हवे.
Health Special माणसाच्या त्वचेवर घाम येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्वचेखाली असणार्या स्वेदग्रंथींमधून जो द्राव तयार करुन त्वचेवर पसरवला जातो, त्याला ’स्वेद (घाम)’ म्हणतात. आयुर्वेदाने स्वेद हा एक मल (त्याज्य पदार्थ) मानलेला असला तरी प्रत्येक मलाचेही स्वतःचे असे शरीर उपयोगी कार्य असते. घाम त्वचेला ओलावा पुरवून त्वचा स्निग्ध ठेवतो आणि त्वचेवरील सूक्ष्म रोमांचे धारण करतो. आयुर्वेदाने स्वेद (घाम) शरीरामधील उष्णता बाहेर फेकण्याचे कार्य करतो असे सांगितले आहे. वास्तवातही शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य घामाकडून होते.
घाम कसा येतो?
त्वचेवर स्रवलेल्या घामामध्ये असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन थंडावा तयार केला जातो, जो त्वचेखालील रक्तवाहिन्यांमधून वाहाणार्या रक्ताला थंड करतो. शरीरभर फिरणारे हे रक्त शरीराचे तापमान वाढू देत नाही. घाम स्रवणाऱ्या दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. एक्क्रिन (eccrine) आणि एपोक्रिन (Apocrine). यामधील एक्क्रिन प्रकारच्या ग्रंथी शरीरभर आधिक्याने असतात, ज्या त्वचेच्या पृष्ठभागावर उघडतात. एपोक्रिन प्रकारच्या स्वेद-ग्रंथी केसांच्या मुळाशी उघडतात आणि स्वाभाविकच डोके, काख, जांघ अशा ठिकाणी जिथे केस आधिक्याने असतात तिथे आधिक्याने दिसतात.
नैसर्गिकपणे किती घाम सामान्य मानला जातो?
निरोगी शरीरामधून साधारणपणे ७५० मिलीलीटर इतका घाम दिवसभरातून तयार केला जातो. मात्र सभोवतालचे वातावरण उष्ण असताना घामाचे प्रमाण वाढू शकते. तीव्र उन्हाळ्यात परिश्रमाचे काम करणार्या माणसाच्या शरीरामधून तासाभरातून २ ते ४ लीटर आणि दिवसभरातून १० ते १४ लीटर इतक्या प्रचंड प्रमाणातसुद्धा घाम तयार केला जाऊ शकतो, जो अर्थातच त्या कडक उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्याचे काम करतो. शरीराचे आभ्यन्तर तापमान नियंत्रणात ठेवण्यात व शरीराला थंडावा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा घाम आधुनिक जगातल्या लोकांना येणार नसेल, (ज्याचे कारण असते सभोवतालचे कृत्रिम गार वातावरण) तर अशा मंडळींच्या शरीराचे स्वास्थ्य बिघडणे स्वाभाविक असते. अखंड एसीच्या गार वातावरणात राहणार्या, शरीराचा उन्हाशी-बाह्य नैसर्गिक वातावरणाशी संपर्क येऊ न देणार्या, न चालणाऱ्या, न फिरणार्या, खेळ-व्यायाम न करणार्या अनेकांना जेव्हा घामच येत नाही तेव्हा त्यांना होणाऱ्या संभाव्य विकृतींचा विचार आपण पुढे करणार आहोतच
घाम कमी येण्यामागील कारणे
- घाम निर्माण करणार्या स्वेद ग्रंथींची मुखे बंद होणे
- जंतुसंसर्ग
- त्वचा आघात, उदा. त्वचा भाजणे वा अपघातात त्वचा फाटणे,
- उष्णतेने येणार्या पुळ्या, घामोळे
- सोरियासिस हा त्वचाविकार
- स्क्लेरोडर्मा (scleroderma) हा त्वचा व शरीरजोडणी करणार्या कोषांसंबंधित स्व-रोगप्रतिकारशक्ती जनित आजार (auto-immune disease)
- मल्टिपल स्क्लेरोसिस, कंपवात अर्थात पार्किन्सन्स डिसिज, स्मृतिभ्रंश (dementia with Lewy bodies), वगैरे केंद्रिय चेतासंस्थेसंबंधित आजार
- मधुमेह,रॉस सिन्ड्रोम (Ross syndrome), ब जीवनसत्त्वांची कमी, वगैरे स्थानिक नसांना विकृत करणारे आजार
- hypohidrotic ectodermal dysplasia (HED) सारखा दुर्मिळ अनुवंशिक आजार
- विशिष्ट औषधांमुळे. जसे की- मानसिक रोगांवरील औषधे, अति रक्तदाबावरील विशिष्ट औषधे (calcium-channel blockers)
उन्हाळ्यात जेव्हा शरीरामध्ये उष्णता वाढते तेव्हा ती उष्णता कमी करण्याचे कार्य करतो घाम. मात्र आधुनिक जगात वेगवेगळ्या कारणांमुळे जेव्हा घाम येत नाही तेव्हा शरीरामधून उष्णता बाहेर फेकली जात नाही हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे.