आरोग्य

उन्हाळ्यात शरीर ठेवायचंय थंड, तर मदत करतील ‘ही’ योगासनं; पाहा करण्याची योग्य पद्धत

तुम्हाला माहिती आहे का, योग करून तुम्ही उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवू शकता. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. चला जाणून घेऊया अशा योगासनांविषयी, जे उन्हाळ्यात तुम्हाला कुल ठेवतील.

 उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा ३५ च्या पुढे गेला आहे. त्यामुळे उष्णतेवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी आरोग्याची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, योग्य आहार, झोप यांसोबतच योगादेखील तितकाच उपयुक्त आहे. लठ्ठपणा दूर करून शरीराला एक परिपूर्ण आकार देणे असो किंवा आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळवणे, योगासने हा प्रत्येक समस्येवर उपाय आहे. फक्त शारीरिक, मानसिक स्वास्थ्यच नाही, तर योग करून तुम्ही उन्हाळ्यातही स्वतःला थंड ठेवू शकता.

योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. उच्च रक्तदाब, हृदय-श्वसनाचे आजार व मधुमेह असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह सर्व जण याचा सराव करू शकतात.

शीतली प्राणायाम

शीतली प्राणायाम आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी केला जातो. या प्रकारात तोंडावाटे हवा आत घेऊन नाकावाटे सोडली जात असल्याने शरीराला थंडावा मिळतो. या प्राणायामाने मध्यवर्ती मज्जासंस्था शिथिल होते. पोटशूळ, ताप, पित्तविकार तसेच चिडचिड कमी करण्यासाठी प्राणायामाचा हा प्रकार महत्त्वाचा आहे. नित्य सरावामुळे उच्च रक्तदाबही नियंत्रित होतो.

शीतली प्राणायाम कसा करावा?

१. जमिनीवर शांत बसा.

२. डोळे बंद करा आणि ध्यानस्थ व्हा.

३. जीभ बाहेर काढा. जीभ दोन्ही बाजूंनी थोडी वळवा. जिभेला नळीसारखा आकार येईल.

४. जिभेद्वारे तोंडातून श्वास आतमध्ये घ्या आणि नाकाद्वारे सोडा.

५. श्वास आतमध्ये घेताना हवेनुसार ध्वनी निर्माण होईल. त्याशिवाय श्वास आतमध्ये घेताना थंडावा जाणवेल.

शीतली प्राणायाम

हे एक प्रकारचे श्वास घेण्याचे तंत्र आहे; जे आपले शरीर आतून थंड करण्यासाठी विशेषत्वाने उपयुक्त ठरते. हा प्राणायाम करण्यासाठी गुडघ्यांवर हात ठेवून सुखासन किंवा पद्मासनात बसा. आपली जीभ पूर्णपणे बाहेर काढा आणि जिभेला दोन्ही बाजूंनी ट्यूबसारखे वाकवा. आपल्या जीभेतून दीर्घ श्वास घ्या. इनहेलिंगनंतर आपले तोंड बंद करा आणि आपल्या नाकातून श्वास घ्या. हे पुन्हा १० वेळा करा. हे आसन आपल्याला शरीर थंड राखण्यास मदत करते.

शीतकारी प्राणायाम कसा करावा?

१. हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर हात ठेवून सुखासन किंवा पद्मासनात बसा.

२. या आसनात दोन्ही हातांच्या मुठी बंद करून घ्या. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू नाकातून सोडा.

३. उष्माघाताने पीडित लोकांसाठी हे तंत्र खूप चांगले आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी आपण याचा सराव करू शकता.

४. कमी रक्तदाब, फ्लू किंवा सर्दी आणि दमा किंवा श्वसन समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनी ही आसने करणे टाळावीत.

काकी मुद्रा

काकी मुद्रा हे केवळ शरीर थंड आणि मन शांतच करीत नाही, तर त्वचाही चमकवते, तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या काढून टाकते.

काकी मुद्रा म्हणजे काय

काक म्हणजे कावळा. या आसनामध्ये कावळ्याच्या चोचीसारखी मुद्रा बनवतात म्हणून याला ‘काकी मुद्रा’, असे म्हणतात. ही मुद्रा अनेक प्रकारे केली जाते. येथे काही सामान्य प्रकार सांगत आहोत.

काकी मुद्रा कशी करावी?

१. कोणत्याही आसनामध्ये बसून ओठ पातळ नळीसारखे दुमडून कावळ्याच्या चोचीसारखे बनवून घ्या.

२. नाकाच्या टोकाला बघा आणि लक्ष नाकावर केंद्रित करा.

३. नंतर तोंडातून श्वास घेत ओठ बंद करा. काही वेळानंतर श्वास नाकाने सोडा. असे १० मिनिटे करा.

 

शवासन

हे आसन अन्य आसने केल्यानंतर शरीर आणि मनाला आराम मिळावा यासाठी अखेरीस केले जाते. या आसनात मनुष्य हालचाल न करता, शवासारखे पडून राहतो म्हणूनच त्यास शवासन म्हणतात. या आसनामुळे शारीरिक, मानसिक थकवा, ताण कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाब, हृदयरोग, निद्रानाश यांवरही हे उपुयक्त आहे.

शवासन कसे करावे ?

१. जमिनीवर चटई टाकून पाठीवर झोपावे.

२. संपूर्ण शरीर सैल सोडा आणि डोळे बंद करा.

३. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने जमिनीवर ठेवावेत.

४. हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित करा; मात्र तुम्हाला झोप लागणार नाही याची दक्षता घ्या.

५. पाच ते दहा मिनिटे या स्थितीत राहा.

अशा प्रकारे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ही योगासने करा आणि निरोगी व आनंदी राहा

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!