मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंवर चित्रा वाघ यांची टीका; म्हणाल्या, “तुमचं टायमिंग…”
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून 'मराठी नॉट वेलकम' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका, असं आवाहन केलं होतं.
नोकरीच्या जाहिरातीत ‘मराठी नॉट वेलकम’ असं म्हणणाऱ्या गिरगावातील कंपनीविरोधात, तसेच मराठी उमेदवाराला प्रचार करण्यापासून रोखणाऱ्या घाटकोपरमधील एका सोसायटीविरोधात वातावरण तापलेलं असताना बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठीसाठी आवाज उठवला होता. रेणुका शहाणे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ‘मराठी नॉट वेलकम’ म्हणणाऱ्यांना मत देऊ नका असं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनावर भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच वाघ यांनी शहाणे यांना एक पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत.
मुंबईच्या गिरगावातील एका कंपनीने नोकरीसंदर्भातली जाहिरात देताना त्यात ‘मराठी नॉट वेलकम’ असं म्हटलं होतं. तर घाटकोपरच्या एका गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या गुजराती रहिवाशांनी मराठी लोकांना प्रवेश नाकारल्याची, मराठी उमेदवाराला प्रचार करण्यापासून रोखल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांवर भाष्य करत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, “मराठी “not welcome” म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे.”