राजकीय

पदवीधर मतदारसंघातील भाजपचे पारंपरिक वर्चस्व मोडित, सध्या एकमेव आमदार

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील चार जागांची निवडणूक जाहीर झाली. मुंबई आणि कोकण पदवीधर, मुंबई व नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघांमध्ये १० जूनला मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील चार जागांची निवडणूक जाहीर झाली. मुंबई आणि कोकण पदवीधर, मुंबई व नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघांमध्ये १० जूनला मतदान होणार आहे. पदवीधर आणि शिक्षक हे पारंपरिकदृष्ट्या भाजपचे बालेकिल्ले होते. पण गेल्या काही वर्षांत पदवीधर मतदारसंघांतील भाजपचे वर्चस्व मोडित निघाले. ७८ सदस्यीय विधान परिषदेत सात जागा या पदवीधर मतदारसंघाच्या आहेत. काही वर्षांपूर्वी एखादा अपवाद वगळता यातील बहुतांशी जागा या भाजपच्या ताब्यात असत. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेनेच्या प्रमोद नवलकर यांनी सर्वात आधी भाजपचे वर्चस्व मोडून काढले होते. त्यानंतर आजतागायत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात कायम राहिला आहे. सध्या सातपैकी फक्त कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे हे एकमेव आमदार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असेल.

नागपूर, पुणे, कोकण, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार निवडून येत असत. पण गेल्या काही वर्षांत चित्र बदलले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारी ताकद पणाला लावूनही नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. पुणे, अमरावतीतही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या घडीला कोकण वगळता एकाही पदवीधर मतदारसंघात भाजपचा आमदार नाही.

पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघांमघ्ये अधिक मतदार नोंदणी करतो त्याचा फायदा होऊ शकतो. काँग्रेस, राष्ट्रवादीचे इच्छुक मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेताना दिसतात. याउलट भाजपमध्ये नोंदणीच्या आघाडीवर पूर्वीप्रमाणे उत्साह किंवा धडपड दिसत नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास भाजपने तेव्हा विरोध दर्शविला होता व त्याचे पडसाद नागपूर, अमरावती या मतदारसंघांमध्ये उमटले होते. त्यानंतरच भाजपला निवृत्ती वेतन योजनेवरील भूमिकेत बदल करावा लागला होता.

पदवीधर मतदारसंघातील विद्यमान आमदार पुढीलप्रमाणे :

सत्यजित तांबे – अपक्ष (नाशिक), निरंजन डावखरे – भाजप (कोकण), विलास पोतनीस – शिवसेना ठाकरे गट (मुंबई), धीरज लिंगाडे – काँग्रेस (अमरावती), अभिजित वंजारी – काँग्रेस (नागपूर), अरुण लाड – राष्ट्रवादी (पुणे) , सतीश चव्हाण – राष्ट्रवादी (छत्रपती संभाजीनगर)

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!