पावसाने गुजरातच्या आशेवर फेरले पाणी, सामना रद्द झाल्याने प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर
आयपीएल २०२४ च्या ६३ व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार होता. मात्र खराब हवामानामुळे सामना रद्द करावा लागला. या सामन्यात पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही.
अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे आयपीएल २०२४ मधील गुजरात आणि कोलकाता यांच्यातील ६३ वा सामना रद्द करण्यात आला. पावसाने गुजरात टायटन्सच्या आशा धुळीस मिळवल्या असून हा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आयपीएल २०२४ मधील प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडणारा गुजरात हा तिसरा संघ ठरला आहे. याआधी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जही बाहेर गेले आहेत. सामना रद्द झाल्यामुळे कोलकाता आणि गुजरातला प्रत्येकी एक गुण मिळाला. प्लेऑफ्सच्या शर्यतीत राहण्यासाठी गुजरातला दोन गुणांची गरज होती, पण सामना रद्द झाल्यानंतर आता एक गुण मिळाला.
गुजरातचे सध्या १३ सामन्यांत ११ गुण आहेत आणि संघाचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादशी आहे. गुजरात संघाने तो सामना जिंकला तरी संघ जास्तीत जास्त १३ गुणांपर्यंत पोहोचू शकेल. सध्याच्या गुणतालिकेत, आधीच चार संघांचे १४ किंवा त्याहून अधिक गुण आहेत. अशा परिस्थितीत गुजरातचा संघ बाहेर पडला आहे. कोलकाता संघ आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. सामना रद्द झाल्यानंतर गुजरातच्या खेळाडूंनी लॅप ऑफ ऑनरचे प्रदर्शन केले. त्यांनी मैदानात फिरून चाहत्यांना अभिवादन केले आणि त्यांचे आभार मानले.
प्लेऑफ्समध्ये स्थान मिळविणारा पहिला संघ कोलकाता नाईट रायडर्स आहे. त्याच्या खात्यात १९ गुणसह असून संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्याची स्पर्धा सहा संघांमध्ये आहे. अजूनही तीन जागा रिक्त आहेत. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे स्पर्धेतील संघ आहेत. राजस्थान रॉयल्स (१६) आणि सनरायझर्स हैदराबाद (१४) दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्सचे समान १२ गुण आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे प्रत्येकी १० गुण आहेत आणि ते जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात.
गुजरात टायटन्सच्या चाहत्यांच्या पदरी निराशा –
गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार होता. पण अहमदाबादमध्ये भरपूर पाऊस झाला. मात्र, रात्री दहानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास सामना रद्द करण्यात आला. अनेक चाहते सामना सुरू होण्याची वाट पाहत होते. पण हे होऊ शकले नाही. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या चाहत्यांच्या पदरी निराशा आली