उन्हाळ्यातील पाऊस- किती चांगला, किती वाईट?
गेल्या तीन- चार वर्षांत उन्हाळ्यातील पाऊस आता नेहमीचाच होतो की काय अशी भीती वाटावी, अशी स्थिती आहे. पावसानंतर उकाडा जरा कमी होतो आणि किंचित दिलासाही मिळतो. पण पाऊस किती चांगला किंवा किती वाईट, तज्ज्ञांकडून जाणून घेऊ!
साधारण मागच्या दशकापासून ग्रीष्म ऋतूमध्ये (मे महिन्यात) कडक उन्हाळा असूनही बर्याच ठिकाणी वातावरण कुंद होऊन पाऊस पडू लागला आहे. मात्र अंदाजे तीन ते साडेतीन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये उन्हाळ्यात पडणार्या पावसाचा उल्लेख आहे. याचाच अर्थ प्राचीन काळापासून ग्रीष्म ऋतूमध्येसुद्धा पाऊस पडत असावा. ग्रीष्मातल्या उन्हाळ्यातसुद्धा क्वचित पाऊस पडतो. त्यातही ज्या दिवशी हवेतला उष्मा प्रचंड प्रमाणात वाढतो, सहसा त्या दिवशी, त्यातही सायंकाळी हलका (तर काही ठिकाणी मुसळधारसुद्धा) पाऊस पडतो… तापमानातील फरकामुळे अनेकजण लगेचच आजारी पडतात किंवा रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या काहींच्या तर जीवावरही बेततं.
वास्तवात आयुर्वेदानुसार अशाप्रकारे जो ऋतू सुरु आहे त्या ऋतूऐवजी भलत्याच ऋतूची लक्षणे दिसणे हा काळाचा मिथ्यायोग म्हटला जातो. मिथ्या म्हणजे चूक अर्थात ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्याची अपेक्षा आहे, पावसाची नाही. असे असतानाही ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात पाऊस पडला तर ती काळाची चूक आहे, जी आरोग्यास हानिकारक आणि रोगांना आमंत्रण देणारी ठरते, असे आयुर्वेद सांगतो.
‘काळ’ या घटकाचा सृष्टीवर व शरीरावर होणारा प्रभाव लक्षात घेऊन आयुर्वेदाने काळाचे ‘अति- हीन- मिथ्या’ असे तीन प्रकार केले आहेत. (अष्टाङ्गसंग्रह १.९.१००) उन्हाळ्यात अतिप्रचंड प्रमाणात येणारा कडक उन्हाळा म्हणजे अतियोग, उन्हाळा असूनही क्वचितच पडणारे ऊन व त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रताच- उष्मा न जाणवणे हा झाला हीनयोग आणि अपेक्षित ऋतूच्या विपरित ऋतूलक्षणे दिसणे म्हणजे मिथ्यायोग. अति- हीन व मिथ्या हे काळाचे तीनही प्रकार निसर्गावर आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करतात, असे निश्चित मत प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी व्यक्त करुन अशा काळामध्ये मनुष्य आजारी पडण्याचे व संसर्गजन्य आजार सर्वत्र फैलावण्याचे प्रमाण वाढते, अशी सावधगिरीची सूचनाही देऊन ठेवली आहे.
उन्हाळ्यामध्ये वातावरण थंड होणे किंवा पाऊस पडणे हा झाला उन्हाळ्याचा मिथ्यायोग. यामधील उन्हाळ्यात पाऊस हा आपल्याला सध्या अनुभवास येतो आहे, जो आरोग्यास पूरक नाहीच. असा अवकाळी पडलेला पाऊस हा वातावरणात अचानक बदल करुन विषाणूंचा फैलाव होण्यास आणि विषाणूजन्य संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्यास कारणीभूत होतो, तसाच अवकाळी पाऊस शेतीसाठीसुद्धा धोकादायक ठरतो आणि पिकाचे व पर्यायाने आपलं पोट भरणार्या शेतकर्याचेसुद्धा नुकसान करतो.
ग्रीष्मातल्या पावसाचे पाणी स्वास्थ्यास अनुकूल
उन्हाळ्यातला अवकाळी पाऊस हा मिथ्यायोग असला आणि सभोवतालचे वातावरण बिघडवून अस्वास्थ्यास कारणीभूत होत असला तरी प्रत्यक्षात या पावसाच्या पाण्याच्या गुणांबद्दल सांगताना मात्र चरकसंहितेने म्हटले आहे की, ग्रीष्म ऋतूमधील पावसाचे पाणी हे अभिष्यन्दी नसते. (चरकसंहिता १.२७.२०६) अभिष्यन्दी याचा एक अर्थ असा की त्या पाण्यामध्ये बुळबुळीतपणाचा दोष नसतो आणि ते पाणी शरीरामध्ये कफाचा चिकटपणा वाढवत नाही, सूज वाढवत नाही. याशिवाय अभिष्यन्दी याचा अर्थ त्वरित रोग निर्माण करण्याजोगी अवस्था निर्माण करणारे आणि त्याच्या विरोधी ते अनभिष्यन्दी.(सुश्रुतसंहिता १.४५.२५, डल्हणव्याख्या)
मथितार्थाने ग्रीष्मातल्या पावसाचे पाणी हे दोष वा रोग निर्माण करत नाही. साहजिकच ते आरोग्याला अनुकूल असते. ऋतुमध्ये होणारा अकस्मात बदल’ हे काश्यपसंहितेने शरीर- संचालक वात-पित्त-कफ या तीन दोषांमध्ये विकृती होण्याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे आणि ते आयुष्य क्षीण करण्यास कारणीभूत ठरते, असेही म्हटले आहे. आयुर्वेदाने मानवी आयुष्य व त्यावर परिणाम करणार्या घटकांचा विचार करताना जीवनाशी निगडीत प्रत्येक पैलूचा किती सखोल विचार केलेला आहे, हे येथे दिसून येते.