राज्यात आज 18 मे रोजी बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील चार-पाच दिवस अवकाळीचे सावट महाराष्ट्रावर कायम राहणार आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना वादळ वाऱ्याचा तडाखा बसणार
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर एवढा राहणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
आज कोकण तसंच गोव्यामध्ये तापमान उष्ण आणि दमट राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. मुंबईमध्ये देखील वातावरण दमट राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे येथे दिवसा उकाडा जाणवेल.
मराठवाड्यातील नांदेड, लातूर व धाराशिव येथे पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. या ठिकाणी वादळी वारा, गारपीट, तसेच वीजांच्या कडकडाटासह पाऊस (Maharashtra Weather Update ) पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भामध्ये पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
पुण्यात तापमान कसं राहणार?
पुण्यात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.