दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड मध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन गटांसाठी ५३७ जागांसाठी ३२ हजार १६० अर्ज आले आहेत. आज १९ जून पासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
येथे मेहनतीला पर्याय नाही, भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे स्वागत. भरतीत गैरप्रकार कराल तर तुरुंगाची हवा खाल अशी सूचना व गैरप्रकाराबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे बॅनर दौंड येथे भरतीसाठी आलेल्या युवकांच्या माहितीसाठी लावण्यात आलेले आहेत.
दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ व ७ तसेच कुसडगाव येथील गट क्रमांक १९ च्या भरतीची प्रक्रिया दौंड येथे सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेच्या तयारीचा आढावा गट ५ चे समादेशक गणेश बिरादार व गट १९ चे समादेशक दिलीप खेडेकर यांनी दौंड येथील गट ५ च्या मैदानात व राजलक्ष्मी शिवणकर यांनी गट ७ च्या मैदानात घेतला.
गट क्रमांक १९ साठी ८३ जागांसाठी २८९८ अर्ज, गट क्रमांक ५ साठी २३० जागांसाठी १४७६२ अर्ज, गट क्रमांक ७ साठी २२४ जागांसाठी १४५०० अर्ज आले आहेत.
भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी निवड चाचणीच्या ठिकाणी ६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती समादेशक गणेश बिरादार यांनी दिली. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी स्वच्छतागृह व स्नानगृहाची सुविधा करण्यात आली असून त्यांच्यासाठी ना नफा ना तोटा या पध्दतीने खाद्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अशी असणार भरती प्रक्रिया —
रोज एक हजार उमेदवारांना मैदानात प्रवेश दिला जाणार असून सुरुवातीला त्यांची हजेरी घेऊन शारीरिक मोजमाप केले जाणार आहे त्यानंतर बायोमेट्रिक तपासणी होऊन १०० मार्कांची शारीरिक चाचणी होणार आहे.
यामध्ये १०० मीटर धावणे २५ मार्क गोळाफेक २५ मार्क व ५ किलोमीटर धावणे ५० मार्क. मैदानी चाचणी उत्तीर्ण यांची लेखी परीक्षा होऊन त्यानंतर प्रमाणपत्रांची पडताळणी होणार आहे. यानंतर सर्व प्रक्रियेत तोच उमेदवार असल्याची खात्री फोटो व सीसीटीव्ही फुटेज वरून खात्री करून गुणवत्तेनुसार अंतिम निकाल लावण्यात येणार आहे.