स्थानिकांच्या ‘रोजगाराचा प्रश्न लागणार मार्गी’ सामाजिक कार्यकर्त्यांचे उपोषणवर आमदार कुल यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा
यवत (टीम- बातमीपत्र)
नांदूर (ता.दौंड) येथे सुरु असणारे उपोषण आमदार राहुल कुल यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले असुन आमदार राहुल कुल यांच्या पत्नी व भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल यांच्या हस्ते नारळ पाणी देत उपोषण मागे घेतले असल्याची माहिती नांदूरचे सरपंच युवराज बोराटे यांनी दिली.
दौंड तालुक्यातील नांदूर (ता. दौंड) येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश बोराटे, सोमनाथ बोराटे, उमेश म्हेत्रे, राजेश पारवे यांनी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा, यासह अन्य मागण्यांसाठी (दि.१ जुलै) पासून उपोषण सुरू केले होते . उपोषणाच्या नवव्या दिवशी तोडगा निघत उपोषण मागे घेण्यात आले आहे.
आज (दि.९ जुलै) रोजी उपोषण स्थळी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष कांचन कुल यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांबाबत आमदार राहुल कुल यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून दिला. यावेळी आमदार राहुल कुल व उपोषणकर्ते यांच्यामध्ये चर्चा झाली. यामध्ये अधिवेशन संपल्यानंतर लगेचच नांदूर परिसरातील सर्वच कंपन्यांमधील व्यवस्थापक , उपोषणकर्ते व गावकरी यांची एकत्रित संयुक्त बैठक घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिले असता उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
दरम्यान , आमदार राहुल कुल हे मागील वीस वर्षापासून या परिसरातील स्थानिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत असतात. या परिसरात त्यांनी अनेक प्रश्न हे देखील मार्गी लावलेले आहेत . या उपोषणावर त्यांनी आश्वासन देत सर्वच कंपन्यांची एकत्रित बैठक लावून उपोषणकर्त्यांचे देखील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे असेही नांदूरचे सरपंच युवराज बोराटे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष कांचन कुल म्हणाल्या की ,दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हे प्रत्येक प्रश्नावर तातडीने लक्ष घालत असतात युवकांच्या रोजगारासाठी देखील मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केलेले आहे. आज येथे उपोषणास बसलेले युवक यांची मागणी मान्य करत कंपनी प्रशासन व उपोषणकर्ते व गावकरी यांची बैठक लावण्याचे काम आमदार राहुल कुल यांनी केले असून सध्या ते अधिवेशनात असल्याने ही बैठक अधिवेशन संपताच लगेच लावण्यात येईल व प्रश्न मार्गी लागतील असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे , माजी उपसरपंच मयूर घुले ,संतोष गुरव , नामदेव बोराटे ,अविनाश बोराटे , पोपट बोराटे , पोलीस पाटील धोंडीबा थोरात व नेहा प्रवीण बोराटे हे उपस्थित होते.
नांदूर येथील फिल्डगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड कामगार संघटनेचे सदस्य तुकाराम शेंडगे म्हणाले की , आमदार राहुल कुल यांच्यामुळे शिक्षण तिसरी , चौथी , पाचवी ,आठवी असे असणाऱ्या कामगारांना देखील कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यायला लावले तसेच आता त्या कामगारांचा पगार हा 80 हजार रुपये एवढा झालेला आहे. कमी शिक्षण असताना देखील तालुक्यातीलच असणाऱ्या तरुणांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आमच्या बाबत खूप मोठी भूमिका बजावलेली आहे.
नांदूरचे माजी उपसरपंच मयूर घुले म्हणाले की , आमदार राहुल कुल हे नेहमीच विकासकामासाठी आग्रही असतात. नांदूर गावात येण्यासाठी पावसाळ्यात मोठी अडचण निर्माण होत होती जर मोठा पाऊस झाला तर या ठिकाणी नागरिकांना वळसा घालून साधारणतः दोन ते अडीच किलोमीटर लांबून जावे लागत होते मात्र या पूलांची कामे मार्गी लागल्यामुळे काल झालेल्या पावसामुळे देखील आम्हाला जाणे येणे सोपे झाले आहे. तसेच या परिसरातील अनेक विकासकामे ही मार्गी लावण्याचा आमदार राहुल कुल यांनी प्रयत्न केला आहे. या परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी देखील अनेक वेळा आमदारांनी प्रयत्न केला असून त्यातूनच अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.